२ दिवस सुट्टी, शिक्षक मित्राचं आमंत्रण, सहलीला गेले अन् नको ते घडलं

स्वातंत्र्य दिन आणि पतेती या सणानिमित्त लागोपाठ दोन दिवस सुट्टीचे असल्याने तीन शिक्षक, शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर सहलीसाठी गेले. मात्र, चौघांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना गोंदियात १५ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली.

एन. मिश्रा (रा. भिलाई), अरविंद सर (रा. उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (रा. नागपूर) असे या घटनेतील मृतकांची नावे आहेत. गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात तिघेही शिकवत होते. सदर शिक्षकांचं वास्तव्य सध्या गोंदियात होतं. यातील एक शिक्षक नागपूर, एक भिलाई आणि एक उत्तर प्रदेश येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या बुडालेल्या तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

त्यांच्या मृतदेहावर आज राजनांदगाव जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविले जाणार आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि १६ ऑगस्ट पतेती या सणानिमित्त लागोपाठ दोन दिवस सुट्टीचे आल्याने गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गाचे तीन शिक्षक भिलाईतील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर सहलीसाठी गेलेले होते. राजनांदगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतकांमध्ये एन. मिश्रा रा. भिलाई, अरविंद सर रा. उत्तर प्रदेश आणि अतुल कडू रा. नागपूर यांचा मृत्यू झाला आहे.