जळगाव : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने देशातील प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांचा गेल्या दोन वर्षांचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय-डी) जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा लेखाजोखा मांडला आहे. २०२१-२२ मध्ये चार जिल्हे अतिउत्तम श्रेणीत, तर उत्तम श्रेणीतील ३२ जिल्ह्यांमध्ये जळगाव सातव्या क्रमांकावर आले आहे. आधीच्या तुलनेत जिल्ह्याला मिळालेल्या गुणांकनात सुधारणा झाली आहे.
शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाचा एकत्रित अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात जिल्हा स्तरावरील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या सर्वंकष विश्लेषणासाठी निर्देशांक तयार करून या शिक्षण व्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते.
निर्देशांकानुसार मिळालेले गुणांकन हे जिल्ह्याने कुठल्या बाबतीत सुधारणा करणे आवश्यक आहे ते दर्शविते. या अहवालानुसार २०२०-२१ मध्ये उत्तम श्रेणीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या जळगाव जिल्ह्याने २०२१-२२ या वर्षात गुणांकनात सुधारणा करीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.