मुंबई : राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतर पहिल्या टप्पातील 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक नुकतीच पार पडली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. राज्य निवडणुक आयोगाने परिपत्रक जाहीर करून आचारसंहिताही लागू केली आहे. 18 डिसेंबर मतदानाची प्रक्रिया होणार आहे तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे 7751 ग्रा. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाकडून 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. राज्याभरातील या ग्रामपंचातींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आदेशानुसार १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस जारी होईल. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे. तसेच ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू असणार आहे.
या जिल्ह्यात होणार निवडणुका
राज्यात पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या आता दुसऱ्या टप्प्यात 7700 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राज्यातील कोल्हापूर, सांगली, नांदेड, अहमदनगर, अकोला अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, नाशिक, वाशिम, यवतमाळ अशा 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. शिवसेना दोन गटांत फुटल्याने शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकारबरोबरच पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्राम पंचायतींमध्येही तसेच राजकारण पहायला मिळत आहे.