नवी दिल्ली । सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 19 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाहीय. 14 किलोच्या सिलेंडरची किंमत जैशी थे आहे.
खरंतर पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर करतात. त्यानुसार आज 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 19 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १६९८.५० रुपयांवर आला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७४५.५० रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये १९११ रुपयांना मिळणार आहे. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
गेल्या दोन महिन्यांचा विचार करता चार महानगरांमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जवळपास 50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. दिल्लीत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 49.5 रुपयांची स्वस्ताई आली आहे. कोलकतामध्ये हा भाव 52 रुपये, मुंबईत दोन महिन्यात 50.5 रुपये तर चेन्नईत व्यावसायिक गॅसच्या किंमती 49.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्याकिमतीत कोणताही बदल केलेला नाही. जळगावसह मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली होती. जळगावात सध्या १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८०८.५० रुपये इतकी आहे.