तरुण भारत लाईव्ह ।२२ जानेवारी २०२३। जामनेर तालुक्यातील गोद्री येथे 25 ते 30 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकड़ा समाज कुंभ होत आहे. या कुंभाची सर्व 80 ते 90 टक्के तयारी पूर्ण झाली असून, व्यवस्थेतील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. या सहा दिवसीय कुंभात विविध राष्ट्रीय संत, महंत भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कुंभ सोहळ्यात साधारण 10 लाख भाविक येणार आहेत. तेलंगाना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून बजारा, लबाना व नायकडा समाज येणार असल्याची माहिती हिंदू गोर बंजारा व लबाना नायकड़ा समाज कुंभ संचालन समितीचे अध्यक्ष श्यामजी चैतन्य महाराज यांनी शनिवारी गोद्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
धर्म स्थळ, कुंभस्थळ, निवास व्यवस्था, वाहनतळ, यातायात, भोजन व्यवस्था आदी व्यवस्था पूर्ण होत आल्या आहेत. गोद्री या भौगोलिक भागात हजारो तांडे आहेत. बंजारा समाज हा हिंदू धर्म जाणणारा व मानणारा समाज आहे. परंतु बंजारा समाजाला धर्मांतरण करण्यासाठी लक्ष्य केले गेले आहे. या भौगोलिक क्षेत्रात 11 हजार तांडे आहेत. यातील 3500 तांड्यामध्ये प्रत्यक्ष ख्रिश्चनीकरण किंवा ख्रिश्चनांशी संपर्क आल्याने त्यांनी हिंदू संस्कार सोडले आणि चर्चमध्ये जात आहेत, पण आपल्या दाखल्यावर एसटी किंवा एनटी लिहून घेतात, असेसुद्धा छुपे ख्रिश्चन आहेत. काही जण गोरधर्म हा स्वतंत्र धर्म असून बंजारा हिंदू नाहीत, असा अपप्रचार करत आहेत. लातूर येथे बंजारा समाजाने हिंदू संस्कार सोडावे आणि गोरधर्मीय संस्कार अंगीकारावे म्हणून दबाव टाकण्यात आला आहे. बंजारा समाजाचे होणारे ख्रिस्तीकरण रोखण्यासाठी आणि समस्त बंजारा, लबाना व नायकडा समाज एकत्र येण्यासाठी 25 ते 30 जानेवारी दरम्यान हा कुंभ होत आहे व त्याचे आयोजन संतांनी आणि बंजारा समाजाने केले आहे. कुंभ आयोजन निश्चित झाल्यावर त्या त्या गावातील नाईक आणि कारभारी यांचे एकत्रिकरण 9500 तांड्यावर झाले. यासाठी बंजारा समाजाचे 218 कार्यकर्ते पूर्णपणे 3 महिन्यापासून सेवा देत आहे. तसेच बंजारा समाजाचे 400 संत जागरणासाठी तांड्यावर फिरले आणि त्या त्या क्षेत्रात छोट्या मोठ्या 5500 बैठका व संमेलन झाले. प. पू. बाबूसिंगजी महाराज, प.पू. गोपालजी चैतन्य महाराज, प.पू. सुरेशजी महाराज, श्यामजी चैतन्य महाराज, पं.पू.महंत 1008 श्री रामसिंग महाराज, प.पू.1008 श्री श्री चंद्रसिंगजी महाराज हे संत अनेक गावी जाऊन त्यांनी भेटी दिल्या आहेत व समाजाशी प्रत्यक्ष संपर्क साधला असून देशभरातील विखुरलेल्या गोर बंजारा व लबाना नायकड़ा समाजाला एकत्र आणून या समाजाला दिशा देण्यासाठी 500 एकर क्षेत्रात गोद्री कुंभाची जय्यत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोहरागडचे गादीपती प.पू. बाबूसिंगजी महाराज या कुंभाचे अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा गोर बंजारा व लबाना नायकड़ा समाज कुंभ पार पडत असल्याचे श्यामजी चैतन्य महाराज यांनी स्पष्ट केले.
30 जानेवारी रोजी उत्तरप्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार
गोद्री येथील कुंभात 30 जानेवारी रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. तसेच संत मोरारजी बापू, श्रीराम जन्मभूमी कोषाध्यक्ष संत गोविंदगिरीजी महाराज, साध्वी ऋतम्भरा देवी, गुरू शरणानंद महाराज, महामंडालेश्वर प्रणवानंदजी महाराज इंदूर, पूज्य अखिलेश्वरजी जबलपूर, श्री महामंडालेश्वर विश्वेश्वरानंदजी, बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमनीजी, बाबा हरनाम सिंगजी पंजाब दमदमी टाकसाल, माता अमृतनन्दमयी कोइंम्बतूर , पूज्य भास्करगिरीजी महाराज देवगड, महामंडालेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर आदी साधू महंतांची उपस्थिती या कुंभाला असणार आहे.
पूज्य धोंडीराम बाबा, आचार्य चंद्रबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार
गोदी येथे अ. भा. हिंदू गोर बंजारा व लबाना- नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारीदरम्यान होत असून या कुंभमेळ्याला राष्ट्रीय स्वरूप आले आहे. कुंभासाठी अनेक राष्ट्रीय संत महात्मे आणि विशेष अतिथी येणार आहेत. ज्या गोद्री ग्राममध्ये कुंभ होत आहे ते पूज्य धोंडीराम बाबाजी आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे व त्यांचा थेट गुरुनानक देवजी यांच्याशी संबंधित मोठा इतिहास आहे. त्यामुळे कुंभादरम्यान लबाना समाजातील श्रद्धास्थान असलेल्या पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या मंदिराची गोद्री येथे उभारणी झालेली असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 25 रोजी करण्यात येणार आहे.