धर्मांतर केले तर १० वर्षे शिक्षा, दंगेखोराची मालमत्ता जप्त – योगी आदित्यनाथ

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : धर्मांतर केले तर १० वर्षे शिक्षा आणि दंगा केला तर तीन दिवसात मालमत्ता जप्त हा आमचा कायदा आहे. प्रतिकूल परिस्थितीत बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठी संघर्ष सुरू आहे. समाजावरील गुलामगिरीची ही चिन्हे नष्ट करावयाची आहेत आणि आपल्या वारसाचा गौरव करावयाचा आहे. या देशात धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही, असा खणखणीत दम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोद्री येथे आयोजित विराट कुंभात दिला.

ते अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना, नायकडा समाज कुंभाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. ३० रोजी या कुंभाचा सहावा आणि अंतिम दिवस होता. सहा दिवसीय बंजारा कुंभात १२ लाख भाविकांनी सहभाग नोंदविला.

यावेळी धर्मसभेच्या व्यासपीठावर योग गुरू रामदेवबाबा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री शंकाराचार्य सदानंद सरस्वती महाराज (श्री द्वारका शक्तीपिठाचे), ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महामंडलेशवर जनार्दन हरीजी महाराज, कुंभाचे अध्यक्ष बाबूसिंग महाराज, कुंभमेळा संचालन समितीचे अध्यक्ष श्यामजी चैतन्य महाराज, गोपाल चैतन्य महाराज, धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, भय्याजी जोशी आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभाच्या समारोपात ऑनलाईन सहभाग नोंदविला.

भेदभाव करत नाही, मात्र कुणी आस्थेशी खेळल्यास सहन होणार नाही. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात जन्म घेणे दुर्लभ आणि त्यातच मनुष्य जन्माला येणे दुर्लभ आहे. सनातन धर्म मानवता कल्याण मार्ग प्रशस्त करतो. सनातन धर्म म्हणजे मानव धर्म. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थ व्यवस्था राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नामांतर होऊन अमृत गार्डन झाले. ५०० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेलं राम मंदिर पुढील वर्षी पूर्ण होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठीच्या संघर्षांतून आपल्या गुलामगिरीची चिन्हे नष्ट करायची आहेत आणि आपल्या वारसाचा गौरव करायचा आहे. एक भारत श्रेष्ठ भारत वर काम करायचे आहे. जाती भेद ,भाषा भेद आणि प्रांत भेद नको. बंजारा समाज नेहमीच धर्म स्थापनेत पुढे राहिलेला आहे. हा समाज लढवय्या, पराक्रम, शूरवीर असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदा होण्याची गरज

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशाप्रमाणे इतर राज्यातही धर्मांतर बंदीचा कायदा होण्याची गरज आहे. धर्मांतरांचे षडयंत्र कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. बंजारा समाजाने देश आणि धर्मासाठी संघर्ष केला असून हा समाज पराक्रमी वीरांचा समाज आहे. सर्व कामनापूर्ती, सिद्धी प्राप्तीसाठी कुंभ असतो. भारत मातेच्या रक्षणासाठी बंजारा समाजाचे व्यापक कार्य असल्याची इतिंहासात नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील मंदिरात पुढील वर्षी विराजमान होणार प्रभू श्रीराम

अयोध्यात साकार होणार्‍या राम मंदिरात बोलताना ते म्हणाले की, अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्यत श्रीराम मंदिराची निर्मिती होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वात राम मंदिरासाठी लढा देण्यात आला होता. या अयोध्याच्या मंदिरात पुढील वर्षी प्रभू श्रीराम विराजमान होतील. एक लाख भाविक एकाचवेळी दर्शन घेऊ शकतील, अशी प्रशस्त व्यवस्था या मंदिरात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हदू धर्म टिकला तर राष्ट्रवाद टिकेल -शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराज

श्री शारदा शक्तीपिठाचे व्दारकापीठाधिश्‍वर शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतात हिंदू धर्म टिकला तर राष्ट्रवाद टिकेल. हिंदू आणि हिंदुत्व वेगळे नाही. बंजारा समाजाच्या पूर्वजांनी हिंदू धर्मासाठी त्याग केला आहे, धर्म परिवर्तन करताना त्यात कोणते दोष पाहिले आणि धर्मांतरित होताना त्या धर्मात कोणती वैशिष्ट्ये पाहिली याचा विचार करावा. देशात चार मठ हिंदू धर्माच्या रक्षणासाठी असल्याचे सांगितले.