छत्रपती संभाजीनगर | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर होण्याची शक्यता आहे. शहरातील लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनकडून राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वारंवार अपमानास्पद शब्द वापरत असल्याने फाऊंडेशनच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात येणार आहे.
गरिबांना आरोग्य सुविधा, शासनाच्या सोयी-सुविधा पुरवण्याचं काम लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनकडून करण्यात येते. या संस्थेची बदनामी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप यातून फाऊंडेशनने १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत जी काही विधाने केलीत त्याबद्दल १५ दिवसांत बिनशर्त माफी मागावी. अन्यथा १०० कोटींचा न्यायालयात दावा करणार आहोत तसेच क्रिमिनल केसही फाईल करणार आहोत असे फाऊंडेशनचे वकील सागर नड्डा यांनी सांगितले.
दरम्यान, कलम ५०० अंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाईल. सोशल मीडियाद्वारे माहिती तंत्रज्ञान कायद्याखालीही गुन्हा दाखल होईल. कोर्टामार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. त्यामुळे संजय राऊतांनी बिनशर्त माझे पक्षकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितली नाही तर न्यायालयात याचिका दाखल करू असं वकील सागर नड्डा यांनी म्हटलं आहे.