शेतकऱ्यांनी जगायचं कसं : १०० किलो वांग्याचे मिळाले केवळ ६६ रुपये

बारामती : पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील एका शेतकऱ्याला १०० किलो वांग्याचे केवळ ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, राज्यामध्ये ८०० किलो कांद्याचे २ रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचे आपण पाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जगायचं कसं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये या वांग्याची विक्री करण्यात आली. नंतर या शेतकऱ्याने आपल्या ११ गुंठे शेतातील वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तीन महिने कष्ट करून पिकविलेल्या पिकाच्या काढणीचा खर्च सुद्धा निघत नाही. राज्यकर्त्यांनी एकमेकाची ऊनिधूनी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल; याकडे लक्ष द्यावं अस आता शेतकरी म्हणत आहेत. सध्या राज्यात सर्वच शेतमालाचे भाव पडलेत. त्यामुळे शेतकरी हैराण झालाय.

दरम्यान, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी सुमारे २०० क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला ४०० ते ८०० रुपये क्विंटल म्हणजे चार ते आठ रुपये किलोपर्यंतचाच भाव मिळाला. यातून कांद्यावर झालेला खर्च आणि वाहतूक खर्चही निघणे कठीण आहे. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्यातून चार पैसे हाती येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. कष्टांनी पिकविलेला कांदा चार ते आठ रुपये किलोने ठोक बाजारात आणून विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.