नवी दिल्ली : केंद्र सरकारनं अनेक औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यामुळं औषधांच्या दर कमी होणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोलेस्टेरॉल, शुगर, अंगदुखी, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी3, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होतील. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाच्या NPPA ने औषधांच्या किमंतींबाबत अधिसूचना जारी केली आहे. औषधांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी, कमतरता असल्यास ओळखा आणि उपाययोजना करण्याचं कामही या संघटनेद्वारे केलं जातं. मोठ्या प्रमाणात औषधे आणि फॉर्म्युलेशनसाठी उत्पादन, निर्यात आणि आयात, वैयक्तिक कंपन्यांचा बाजारातील हिस्सा, कंपन्यांची नफा इत्यादींवरील डेटा संकलित करण्याचं काम केलं जातं.
‘या’ आजारांवरील औषधे होणार स्वस्त
कोलेस्टेरॉल, मधुमेह, वेदना, ताप, संसर्ग, अतिरक्तस्त्राव थांबवणे, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी3, लहान मुलांसाठी अँटीबायोटिक्स यासह अँटीवेनम औषधेही स्वस्त होतील. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी अँटीवेनमचा वापर केला जातो. NPPA च्या अधिसुचनेनंतर देशभरात १०० औषधांच्या किंमती कमी झाल्या आहेत.