तरुण भारत लाईव्ह । १३ मे २०२३। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी घोषित केले जातील याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य मंडळाची दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.
यावर्षी बारावीची परीक्षा सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी, तर दहावीची परीक्षा सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी यंदा राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणी झालेल्या संपामुळे काही दिवस शैक्षणिक कामे होऊ शकली नाही.
मात्र त्याचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. बारावीचा निकाल ३१ मे पूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकेल.