शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन तरुणांकडून तब्बल 11 तलवारींचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. रोहित राजेंद्र गिरासे (24) वमनीष ओंकार गिरासे (19, दोन्ही रा.अहिल्यापूर, ता.शिरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला..
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर शहरचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांना तलवार साठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला आदेश दिले होते. गुरुवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास संशयित तरुण दुचाकी (एम.एच.18 ए.यू.9502) वरून शिरपूर फाट्यावर येताच त्यांची झडती घेतल्यानंतर प्लास्टीक कागदात तलवार आढळल्याने ती जप्त करण्यात आली तसेच संशयीतांची खोलवर विचारपूस केल्यानंतर रोहित गिरासे याने काम करीत असलेल्या गॅरेजमध्ये साठा ठेवल्याची कबुली दिली. पथकाने शिरपूर फाट्यावरील बालाजी ऑटो पार्टस् नावाने असलेल्या गॅरेजची झडती घेतल्यानंतर प्लास्टीक गोणीतून 10 तलवारी पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या. एकूण 11 तलवारींसह दोन मोबाईल व दुचाकी मिळून एक लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर निरीक्षक ए.एस.आगरकर, गणेश कुटे, संदीप मुरकुटे, हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रवीण गोसावी, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, भटू साळुंके, होमगार्ड मिथून पवार, चेतन भावसार, शरद पारधी, राम भील आदींच्या पथकाने केली.