पिंपळनेर : जेबापूर शिवारातील शेतात असलेल्या झोपडीमधील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करीत तब्बल ११ बकऱ्या फस्त केल्या. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. पिंपळनेर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यामध्ये आठ बकऱ्या व तीन बोकडांचा समावेश आहे. दरम्यान, या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये व मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपळनेर येथील नंदकुमार बाबूलाल ढोले यांचे जेबापूर शेत शिवारात दोन झोपड्या असून एका झोपडीमध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर वन्यप्राणाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. यामध्ये आठ बकऱ्या व तीन बोकड ठार झाले, सदर घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेचा पंचनामा पिंपळनेर वनविभागाच्या पथकाने केला. यावेळी पथकाने परिसरात पाहणी केली असता काही अंतरावर वन्यप्राणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे सदर बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच नुकसानग्रस्त पशुपालकास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, शेत शिवाराकडून शहरी भागाकडे बिबट्याची दहशत वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्याठिकाणी घटना घडली तेथून काही अंतरावरच रहिवाशी भाग आहे. सुदैवाने बिबट्याने नागरी वस्तीकडे शिरकाव केला नाही.
सुदैवाने १२ बकऱ्यांचा जीव वाचला
झोपडीत एकूण २३ बकऱ्या होत्या त्यातील ११ बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या असून १२ बकऱ्यांचा जीव वाचला आहे.
पहारेकरी त्यादिवशी तेथे झोपले नाही
या झोपड्यांच्या बाहेर दररोज शेतातील रखवालदार बकऱ्यांचा सांभाळ करीत होता. मात्र गेल्या २-३ दिवसांपासून अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने तो झोपड्यांजवळ न थांबता शेतीकामासाठी घरीच थांबला. सुदैवाने काल सोमवारी घटना घडली तेव्हाही ते नव्हते.अन्यथा मोठी घटना घडली असती.
शेतकरी व मजूरांमध्ये भीती
या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये व मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात मजूर मजुरीसाठी पुढे यायला तयार नाहीत परिणामी शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. तर रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. भविष्यात शेतकऱ्यांवर किंवा मजुरांवर देखील हल्ला होऊ शकतो त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.