ब्रेकिंग न्यूज : अशोक चव्हाणांसोबत ११ आमदार ?

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक काही नेते देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. राजूरकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर 15 आमदार घेऊन यावे, अशी अट भाजपकडून ठेवण्यात आल्याची चर्चा असतानाच काँग्रेस नेते विश्वजीत कदम  यांचं नाव आता चर्चेत आलं आहे. विश्वजीत कदम पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीय. त्याचसोबतच ५-६ आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगली आहे. हिरामण खोसकर, सुलभा खोडके, अस्लम शेख, अमीन पटेल यांच्यासह अन्य काही आमदारांची नावे चर्चेत आली आहे.

मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. आपला पक्ष प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा असे त्यांनी सांगितले आहे. अमित शहा 15 तारीखेला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत याच दरम्यान अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय म्हणाले विश्वजीत कदम ?
या चर्चेवर विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं मी पुन्हा यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही, आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्या बाबतीत माध्यमात येणाऱ्या बातम्यांबाबत थोरात यांनी वक्तव्य केलं आहे, त्यामुळं त्यावर आता मी बोलू इच्छित नाही,’ असंही कदम यांनी म्हटलं होतं.