---Advertisement---
जळगाव : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाला प्राधान्य देत जनतेच्या विश्वासास पात्र ठरणारे कार्य केले आहे. ही ११ वर्षे आत्मनिर्भर भारताकडून विकसित भारताच्या दिशेने नेत असलेली सुवर्णयात्रा ठरली आहे,” असे प्रतिपादन ना. गिरीश महाजन यांनी केले.
मोदी सरकारच्या ११ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत कार्याचा आलेख मांडला. या पत्रकार परिषदेस ना गिरीश महाजन यांनी सांगितले याप्रसंगी प्रदेश संघटन मंत्री विजय चौधरी, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, चंद्रकांत बाविस्कर व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी मा. आ. दिलीप वाघ, प्रदेश चिटणीस अजय भोळे, प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ (पलांडे ), जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नंदू महाजन प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.
---Advertisement---
ना. महाजन पुढे म्हणाले की, “महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी ठेवणारे निर्णय हे या सरकारची वैशिष्ट्ये आहेत. मुद्रा योजनेतून ३० कोटी कर्जवाटपांपैकी बहुसंख्य महिला लाभार्थी आहेत. पीएम आवास योजनेंतर्गत ७०% घरे महिलांच्या नावे आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियम, मातृ वंदना योजनेसारख्या योजनांनी महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळाली आहे.”
तसेच युवकांसाठीही स्टार्टअप, कौशल्य विकास, डिजिटल इंडिया, मेडिकल शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक निर्णय घेतले गेले आहेत. “गेल्या ११ वर्षांत १७ कोटी रोजगाराच्या संधी तयार झाल्या, १.४२ कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले,” असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी कल्याणासाठी थेट मदत
“११ कोटी शेतकऱ्यांना ३.७ लाख कोटी थेट खात्यात दिले गेले आहेत. सिंचन योजनेसाठी ९३ हजार कोटी, पीक विमा योजनेसाठी १.७५ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे,”* असे सांगत महाजन यांनी अन्नदात्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार किती कटिबद्ध आहे हे स्पष्ट केले.
सामाजिक न्याय आणि समावेशी विकास
एससी, एसटी व ओबीसी समाजासाठी मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे. “प्रधानमंत्री किसान, पीएम आवास, मुद्रा योजना यामध्ये या घटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे,” असे महाजन यांनी सांगितले.
ऐतिहासिक निर्णय व आर्थिक प्रगती
“कलम ३७० हटवणे, तिहेरी तलाक गैरकायदेशीर ठरवणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, वक्फ सुधारणा कायदा या निर्णयांनी सरकारने देशहित व सामाजिक समतेची दिशा स्पष्ट केली आहे,” असे ते म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था जगात लवकरच चौथ्या क्रमांकावर पोहोचणार असून, गतिशक्ती, भारतमाला, इंडस्ट्रियल कॉरिडॉरसारख्या योजनांनी संपूर्ण देश गुंतवणूकक्षम बनल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मागील तीन दिवसात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पेरणीचे दिवसअसल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी असा आमचा प्रयत्न असून आम्ही ती मदत देऊ असेही ना. महाजन यांनी सांगितले.
जामनेरमध्ये उद्योग उभारण्याच्या पार्श्वभूमीवर रेमण्ड, कोको कोला, टेक्स्टाईल बाँबे रियन सारख्या कंपन्यांनी दोन ते तीन वेळा जामनेरला भेट दिली आहे. आगामी दोन तीन महिन्यात नवीन प्रकल्पाल सुरु झालेला असेल असा विश्वास ना. महाजन यांनी व्यक्त केला.