नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यात झालेला पाऊस आणि वादळामुळे १२० घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामेदेखील केले आहेत. परंतु अद्याप एकाही घरमालकाला नुकसान भरपाई मिळाली नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, शेती नुकसानीचेदेखील पंचनामे करण्यात आले असून, त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात ६ मेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. वादळ आणि पाऊस जिल्हाभरात भाग बदलून सुरू आहे. चार वेळा झालेला मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मात्र घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
तब्बल १२० घरांचे अंशतः आणि पूर्णतः नुकसान झाल्याचा पंचनामा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. मे महिन्यात वादळ आणि पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान होण्याची ही गेल्या अनेक वर्षातील पहिलाच प्रकार आहे.
नुकसानग्रस्त घरमालकांना भरपाई देण्याबाबत अद्याप प्रशासकीय स्तरावर काहीही हालचाली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे संबंधित हवालदिल झाले आहेत. केवळ पंचनामे करून दिलासा देण्यात आला आहे.
नुकसानभरपाईबाबत पाठपुरावा करावा व दिलासा द्यावा, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. अशीच स्थिती पीक नुकसानीची देखील आहे. केळी, मका, टरबूज, पपई या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यांचेही पंचनामे करण्यात आले आहेत.
फळ पिकांनाही बसला मोठा फटका
कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे केले आहेत. परंतु दोन ते तीन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सध्या खरीप पूर्व हंगामासाठी शेत तयार करण्याचे काम सुरू असल्याने शेतात पीक नसल्याने नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.