१२वी १०वी परीक्षा : ..तर यांच्यावर होणार गुन्हा दाखल – जिल्हाधिकारी

जळगाव :12वी व दहावीच्या परिक्षेच्यावेळी जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याकरीता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कॉपीमुक्त परिक्षा अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. नितिन बच्छाव यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काय म्हणाले जिल्हाधिकारी?
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाल्या नाहीत. तर शाळास्तरावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी परीक्षेत कॉपी करण्याचे व कॉपी पुरवण्याचे गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व विभागांकडून एकत्रीतपणे प्रयत्न केले जाणार आहेत. यास पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, माध्यमे व शिक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले.

हे अभियान राबविताना परीक्षा केंद्राचे अतिसंवेदनशील, संवेदनशील व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात येणार असून कॉपीचे प्रकार होणा-या परिक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रत्येक परिक्षा केंद्रावर बैठे पथक तसेच भरारी पथकही नियुक्त केले जाणार आहेत.

शिवाय ठराविक पेपरच्या दिवशी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हेही परिक्षा काळात विविध परिक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांची झडतीही घेतली जाणार आहेत. गोपनीय परिक्षा साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे जीपीएस लोकेशन घेतले जाणार आहेत.

ज्या परीक्षा केंद्रांवर जास्त कॉपीचे प्रकार घडतील त्या परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालकांवर कारवाई करण्यात येणार आहेत, जिल्ह्यात गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला जाणार आहेत.

या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ त्याठिकाणी पोलीस व इतर पथक पोहचणार आहेत. परीक्षा केंद्रावर 50 मीटरच्या आत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेशास बंदी राहणार असून परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिक्षा केंद्र परिसरात सीसीटीव्हीचीही नजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात हे अभियान यशस्वी होण्यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात आली असून त्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 12 संवदेनशील परिक्षा केंद्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.

परिक्षेत कॉपी करणारे व पुरविणारे यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी पोलीसांबरोबरच होमगार्डही कार्यरत राहणार आहेत. असे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षेसाठी 76 परीक्षा केंद्रावर 47 हजार 370 तर दहावीच्या परीक्षेसाठी 138 परीक्षा केंद्रावर 56 हजार 865 विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याचे शिक्षणाधिकारी श्री. बच्छाव यांनी सांगितले.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. जेणेकरून त्यांना कॉपी करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच पालकांनीही कोणी पास करुन देतो अशा भूलथापा देत असल्यास त्यांना बळी पडू नये. कोणी याप्रकारच्या भूलथापा दिल्यास याबाबत त्वरीत प्रशासनास कळवावे व जिल्हा प्रशासनाच्या या अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सहभागी होवून हे अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले.