तरुण भारत लाईव्ह न्युज | भुसावळ : गणेश वाघ – राज्यातील 14 उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी मंगळवार सायंकाळी काढले आहेत. त्यात जळगावातील दोन उपजिल्हाधिकार्यांसह अमळनेर प्रांताधिकार्यांची बदली झाली असून भुसावळातील प्रांताधिकार्यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्या जागी अहमदनगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील बदलून येत आहेत. बदलीनंतर तत्काळ अधिकार्यांनी आपल्या पदाचा पदभार घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील
भुसावळचे प्रांत रामसिंग सुलाणे यांनी अधिकाराचा अमर्याद गैरवापर केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीअंती त्यांचे नुकतेच निलंबन करण्यात आल्याने भुसावळात कुणाची नियुक्ती होते याकडे लक्ष लागले होते मात्र भुसावळ प्रांताधिकारी पदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून बुधवारी सायंकाळपर्यंत ते पदभार घेण्याची शक्यता आहे.