दुर्दैवी! बकऱ्या चारण्यासाठी गेला, मात्र काळाचा घाला

यावल : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या साकळी येथील १४ वर्षीय बालकाचा पाटचारीच्या पाण्यात पडुन बुडून मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल मुंकुंदा सोनवणे असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील साकळी येथील आंबेडकर नगरातील रहीवासी निखिल मुंकुंदा सोनवणे (वय १४) हा दहावीला आहे. निखील हा साकळी शिवारातील पाटचारीजवळ २२ फेब्रुवारी बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. यावेळी गावातीलच राहणारा रणविर भिला सोनवणे हा देखील त्याच्यासोबत बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. हातपाय धुण्यासाठी पाटचारीजवळ गेला असता त्याचा पाय घसरून पाण्यात पडला. त्‍याला बाहेर येता न आल्‍याने त्‍याचा बुडून मृत्‍यू झाला.

निखीलच्‍या सोबत असलेल्या रणविर सोनवणे याने तात्काळ गावाकडे धाव घेत घटनेची माहीती दिली. गावातील काही तरूणांनी पाटचारीकडे धाव घेतली. निखिल सोनवणे यास पाटचारीतुन बाहेर काढुन तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.

या संदर्भात दिलेल्या माहितीवरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी निखिल सोनवणे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.