मुंबई : बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत, ज्यातील दोन जखमा खोलवर आहेत. डॉक्टरांच्या मते सैफची प्रकृती आता स्थिर असून त्याला गुरुवारी रात्रीपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
गुन्हे शाखेने हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कंबर कसली असून एकूण 15 पोलिस टीम तपासात झुपल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम याप्रकरणी कार्यरत असून एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकही तपासात सामील झाले आहेत.
वांद्रे पोलीस ठाण्याने देखील सात टीम तपासासाठी उभ्या केल्या आहेत. सैफ अली खानच्या इमारतीत गेल्या काही दिवसांपासून फ्लोअरिंग पॉलिशिंगचं काम सुरू होतं. या कामाच्या संदर्भात पोलिसांनी काम करणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली आहे.
सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही अज्ञात व्यक्ती दिसल्या असून पोलिसांनी त्या व्यक्तींविषयी तपास सुरू केला आहे. पोलीस मानतात की हल्लेखोर चोरीच्या उद्देशानेच घरात शिरला होता.
सैफच्या घरातील मोलकरीणीने हल्लेखोराला पाहिलं आणि आरडाओरडा केला, ज्यामुळे सैफ जागा झाला आणि त्याच्या आणि हल्लेखोराच्या दरम्यान संघर्ष झाला. या घटनेमध्ये मोलकरीणीला देखील दुखापत झाली. सैफच्या कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असून पोलीस तपास करत आहेत.