जळगाव : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. या शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत, यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेंतर्गत जिल्हाभरात 872 वारसनोंदींसाठी ई-हक्क प्रणालीत अर्ज दाखल केले आहेत. महसूल प्रशासनाकडे प्राप्त झालेले 150 वारस फेरफार मंजूर करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित 557 प्रस्तावांवरदेखील लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
वारस नोंदणी प्रक्रिया होती वेळखाऊ
महसूल विभागांतर्गत मयत शेतकरी वारस नोंदणी प्रक्रियेत वर्षानुवर्षे दप्तर दिरंगाई होत आली आहे. यामुळे खातेदार शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बहुतांश वहिवाट वंशपरांगत असलेल्या जमिनी बऱ्याच वेळा मयत खातेदारांच्या नावावरच राहतात. त्यामुळे त्यांच्या पश्चात अनेक वारसांना मालकी हक्कासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. दिवाणी प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने मयत शेतकऱ्यांचे वारस, नातेवाईक त्रस्त होत होते.
सर्वाधिक मयत खातेदार अमळनेर तालुक्यात
जिल्हा प्रशासनाकडून 9 हजार 744 मयत खातेदारांची यादी तयार करण्यात आली आहे. या नोंदीत सर्वाधिक मयत खातेदार अमळनेर तालुक्यातून असल्याचे आढळून आले आहेत. अमळनेरमध्ये 1 हजार 115 मयत खातेदार असून जळगाव- 614, जामनेर- 914, भुसावळ- 477, मुक्ताईनगर- 630, बोदवड- 378, रावेर- 769, यावल- 645, पाचोरा- 467, भडगाव- 260, एरंडोल- 400, धरणगाव- 664, पारोळा- 698, चोपडा- 1 हजार 44 व चाळीसगाव- 669 असे 15 तालुक्यात 9 हजार 744 मयत खातेदारांचा समावेश आहे.
‘जिवंत सातबारा’ पारदर्शक आणि लोककल्याणकारी
मयत खातेदारांची शेतजमीन त्यांच्या वारसांच्या नावावर फेरफार करण्यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतून महसूल विभागाची पारदर्शकता वाढवणारी आणि लोककल्याणकारी योजना आहे. या प्रक्रियेत कायद्याच्या चौकटीत राहून तत्काळ निर्णय घेता येतील. तसेच मयत खातेदारांच्या वारसांना वेळ, पैशांची बचत होऊन त्यांना हक्काची जमीन मिळेल, या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव.
‘जिवंत सातबारा’ मोहीम दृष्टिक्षेपात
तालुका वारस नोंद अर्ज फेरफार मंजूर नामंजूर
जळगाव 46 24 24 00
जामनेर 110 102 00 00
भुसावळ 147 147 00 00
मुक्ताईनगर 105 71 31 1
बोदवड 71 31 26 0
रावेर 85 00 00 06
यावल 35 13 00 00
पाचोरा 27 13 00 00
भडगाव 14 1 1 00
एरंडोल 34 22 3 00
धरणगाव 21 00 00 00
पारोळा 55 21 16 5
अमळनेर 81 85 00 00
चोपडा 00 000 000 00
चाळीसगाव 62 62 49 00
एकूण 872 557 150 6