ईश्वर सांगोलकरचा ऊसतोडीचा विक्रम, १२ तासात तोडला १७ टन ३०० किलो ऊस

सांगली : जत तालुक्यातील खैराव येथे ऊसतोड मजुर ईश्वर सांगोलकर यांनी तळपत्या उन्हात १२ तासांत तब्‍बल १७ टन ३०० किलो ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाबद्दल ईश्वर सांगोलकर यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सत्कार केला, तसेच ऊसतोड मजुरांना शासनाकडून सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अंग मेहनतीच्या बळावर ऊसतोडीचा विक्रम करणारे ईश्वर सांगोलकर हे गेली वीस वर्षापेक्षा अधिक काळ ऊस तोड करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. ईश्वर सांगोलकर सांगतात की, त्यांना आपल्या भागात ऊसतोडीचा विक्रम करण्याचा मानस होता. वाहन मालक नवनाथ चौगुले यांना त्यांनी आपला मनोदय बोलून दाखवत एका दिवसात एकटा किती टन ऊसतोड करतो बघा असा आग्रहच ईश्वर सांगोलकर यांनी धरला. वाहन चालक नवनाथ चौगुले यांनीही ईश्वर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

चार दिवसांपूर्वी खैरावमध्येच पांडुरंग चौगुले यांच्या मालकीचा ऊस तोडण्याचे ठरले. ईश्वर सांगोलकर या अवलियाने सकाळी सहा वाजता हातात कोयता घेवून ऊसतोडीस सुरुवात केली. पांडुरंग चौगुले यांच्या शेतात ईश्वर सांगोलकर यांचा कोयता आपला चमत्कार दाखवत होता. बारा तासात १७ टन ३०० किलो ऊस एकट्याने तोडला. या विक्रमाबद्दल राजारामबापू कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी भेटून ईश्वरचा सत्कार केला आहे.