Bhusawal News : पुलगावातील १७ वर्षीय तरुणीने उचललं धक्कादायक पाऊल

पुलगाव, भुसावळ :  तालुक्यातील पुलगाव येथील पुष्पदलाता नगरात १७ वर्षीय संजीवनी दांडगे या तरुणीने आपल्या राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजीवनी हिच्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

संजीवनी दांडगे ही वरणगाव येथील गांधी महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी, संजीवनीने आपल्या घराच्या छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संजीवनीला आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर तिला तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश उगले यांनी तिला मृत घोषित केले. मयत तरुणीच्या वडिल विलास दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरणगाव पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे, गणेश राठोड, आणि ईश्वर तायडे हे तपास करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, संजीवनीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी तपासाची गती वाढवली आहे.