भुसावळ # गणेश वाघ # शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून पोलिसांचा धाक वाटावा, अशी कृतीच यंत्रणेकडून थांबल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. शहरातील भाईंचा दबदबा वाढावा, व्यापारीवर्ग त्यांना दबकून रहावा व खर्च-पाणी चालण्यासाठी आता थेट गुन्हेगारी प्रवृत्तींनी व्यापार्यांनाच टार्गेट केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी शहराने पाहिला. या प्रकारानंतर झोपलेल्या व मरगळ आलेल्या पोलीस विभागाला जाग येणार का? असा अंतर्मुख करणारा प्रश्न शहरवासी उपस्थित करीत आहे. भर दिवसा चोर्या-घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्यानंतर सुटा-बुटातील आरोपींकडून हायप्रोफाईल वस्तीत धाडसी घरफोडी झाल्या व त्याचा तपास लागला असतानाच गत आठवड्यात पिस्टल लावून व्यापार्याची चैन लुटण्यात आली व हे कमी होते काय म्हणून तारखेवर आलेल्या संशयिताच्या नावानेच दोघांनी व्यापार्यांना भरदिवसा धमकावत खंडणी मागितल्याने व्यापार्यांनी व्यवसाय करावा तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हेगारी रोखण्यात यंत्रणा फेल
शहरात यापूर्वी झालेल्या अप्रिय घटनांचा इतिहास पाहता पोलीस दलाकडून गुन्हेगारी त्यावेळी ठेचण्यात आल्यानंतर बर्यापैकी गुन्ह्यांचे प्रमाण थांबले मात्र अलीकडील काळात चोर्या-घरफोड्यांसह पुन्हा दहशत निर्माण करण्यासह थेट व्यापार्यांना धमकावण्याचे प्रकार आठवडाभरात दोन वेळा घडल्याने व्यापारीवर्ग प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहे. गुन्हेगारांना पोलीस दलाची भीती वाटेल, अशी कृती करण्यात शहरातील पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे.
खंडणी प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित
महाराष्ट्रात गाजलेल्या खरात हत्याकांडातील एक संशयित राजा मोघेच्या नावाने शहरातील दोन व्यापार्यांना दोन संशयितांनी धमकावून 10 व 20 हजारांची खंडणी मागितल्यानंतर व्यापार्यांनी हिंमत करीत तक्रार नोंदवली मात्र आणखी काहींना धमकावल्यानंतरही व्यापार्यांनी तक्रारच दिली नसल्याचे बोलले जात आहे. या गुन्ह्यांमध्ये फोनवर धमकावणारा संशयित हा राजा मोघे की अन्य दुसरा कुणी ? हा पोलीस यंत्रणेचा तपासाचा भाग आहे मात्र कारागृहात असलेला व न्यायालयीन तारखेसाठी आरोपी शहरात आल्यानंतरच हा प्रकार घडल्याने आरोपीला शहरात आणणारी पोलीस यंत्रणाही (कैदी पार्टी) संशयित आरोपीच्या पिंजर्यात उभी राहिली आहे. तसे घडले असल्यास दोषी यंत्रणेतील संबंधितावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. या प्रकरणी संशयित राजा मोघेची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. खंडणीतील एका आरोपीच्या मुसक्या बांधल्यानंतर आता दोन संशयितांना निष्पन्न केल्यानंतर खरा प्रकार समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खंडणी प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा
शहरातील गुजराथी स्वीट मार्टचे संचालक कपिल गुजराथी यांच्याकडे दहा हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी राजा मोघे व सोनू मोघे व तसेच दोन अनोळखींविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर गोपी मॉलचे संचालक रवीकुमार गोपीचंद झामनानी (46, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून दोघा अनोळखींविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.