१८ विरोधी पक्षाच्या मोर्चाकडे राष्ट्रवादीने फिरवली पाठ

नवी दिल्ली – संसदेचं अधिवेशन दिल्लीत सुरू असून मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या हिंडनबर्ग प्रकरणात मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा होणारा दुरुपयोग यावर विरोधी पक्षांनी लक्ष्य ठेवून ईडीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र देशातील विरोधी पक्षातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं सहभाग घेतला नाही. विरोधी पक्षांच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसनं गैरहजेरी लावली त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

विरोधी पक्षांच्या मोर्चात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहभागी होते. मात्र राष्ट्रवादी यापासून चारहात लांब राहिल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. एकीकडे नागालँड इथं भाजपा-एनडीपीपी युतीला राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा दिला असा सूर राज्यात उमटला. परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला भाजपाला नाही असा बचावात्मक पवित्रा राष्ट्रवादीने घेतला. त्यानंतर बुधवारच्या विरोधी पक्षाच्या मोर्चात राष्ट्रवादीने गैरहजेरी लावली त्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

दिल्लीत संसदेपासून निघालेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी वाटेतच अडवला त्यामुळे विरोधी नेत्यांना संसदेत पुन्हा परतावं लागले. देशातील भाजपा ज्या प्रकारे आपल्या राजकीय विरोधकांना टार्गेट करत आहे. हे पाहिल्यावर सत्तेतील लोक दुधात धुतले आहेत ते आमच्या सारख्या प्रश्न विचारणार्‍यांना टार्गेट करतात. त्यासाठी हा मोर्चा आवश्यक आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मांडले होते.