---Advertisement---
---Advertisement---
जळगाव । जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार आहे. जिल्ह्यात सव्वा चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शनिवार, ५ रोजी पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे नियोजीत कार्यक्रमानिमित्त आले असता, राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना दसरा, दिवाळीपूर्वीची भेट असून मोठा दिलासा मिळणार आहे.
आतापर्यंत १७ हप्त्यांचा लाभ
पीएम किसान योजनेच्या साईटवर अगोदरच हा हप्ता कधी जमा होणार हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, पंतप्रधान पोहरादेवी येथून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली. यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावर आणि सणासुदीत हा हप्त्याची रकम मदतीला येईल. पीएम किसान योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण १७ हप्ते जमा करण्यात आले आहेत. शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना १८ वा हप्ता मिळाला आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाने ३४,००० रुपये देण्यात आले आहेत. या योजनेत केंद्र सरकारतर्फे प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे प्रत्येकी तीन हप्त्यातून वर्षाला ६ हजार रुपयांची मदत देण्यात येते.
शेतकऱ्यांना दसरा, दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा
राज्य सरकारकडून देखील पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रूपये जमा करण्यात येत असून आतापर्यंत चार हप्त्याचे आठ हजार रूपये जमा झाले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेसोबतच राज्य सरकारच्या नमो महासन्मान योजनेचा देखील ५ व्या हप्त्याचा लवकरच लाभ जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दसरा दिवाळीच्या तोंडावर बऱ्याच प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात ८लाख हेक्टरपेक्षा अधिक कृषी क्षेत्र असून ७ लाख ५० हजार हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ६ लाख शेतकरी आठ अ नुसार खातेदार शेतकरी असून आतापर्यंत साडे चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १३ हजार करपात्र उत्पन्न असलेले शेतकरी आढळून आले होते. केंद्र सरकारच्या निर्दे शानुसार जिल्हा प्रशासनाकडे या शेतकऱ्यांकडून सुमारे सहा कोटीहून अधिक रकमेचा परतावा देखील करण्यात आला आहे.
लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे आवश्यक
अल्प भूधारक व कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आधार, मोबाईल, जमीनीचा खाते उतारा, बँक खाते पासबुकसह ज्या शेतकऱ्यांचे आधार ई- केवायसी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक खात्यासोबत आधार कार्ड ई केवायसी केल्यानंतरच पीएम किसान किवा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ जमा होईल.
– कुरबान तडवी, नोडल अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव