जळगावकरांनो, बाहेरगावी जाताय? थांबा, आधी शेजारी व पोलिसांना कळवा, अन्यथा…

---Advertisement---

 

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात सध्या घरफोडीचे प्रमाण वाढले असून, सात महिन्यात तब्बल १९५ घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजारी व पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिवाळीच्या सुट्या असो की उन्हाळी सुट्या तसेच वर्षभरात केव्हाही बाहेरगावी गेल्यानंतर घरफोडी होण्याची शक्यता असते. यामुळे बंद घरात चोरी करून चोरटे हात साफ करू शकतात. अशाच प्रकारे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात जिल्ह्यात १९५ घरफोड्या झाल्या. अनेक वेळा तर घरफोडी झाली तरी शेजारच्यांना कळतही नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून गावी जाताना शेजाऱ्यांना तसेच पोलिसांना माहिती दिल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात.

शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडीचे प्रकार घडत असतात. त्यात आता गणेशोत्सवापासून विविध सण-उत्सव सुरू होतात. त्यामुळे गणपती दर्शन व आरास पाहणे, दर्शनासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते.

तसेच त्यानंतर दसरा, दिवाळी सणामध्ये गावी जाण्यासह सुट्यांच्या काळात पर्यटनाला जाण्याचे अनेकांचे नियोजन असते. त्या काळात चोरीच्या घटना वाढतात. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजारी व पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संशय आला की लगेच पोलिसांना कळवा…

कोणत्याही परिसरात चोरी, घरफोडी होत असल्याचा अथवा कोणीही संशयास्पद फिरत असल्यास तत्काळ पोलिसांना कळविले पाहिजे. तसे झाल्यास चोरटेही सापडण्याची शक्यता अधिक असते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---