वर्षभरात २ सिलिंडर मोफत; या राज्यात झाली घोषणा

मुंबई : मागील निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीरनाम्यात महिलांना वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. आता सुमारे दीड वर्षांनी या घोषणेची अंमलबजावणी केली जाणार आहे. उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी मोफत एलपीजी सिलिंडर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच होळीच्या दिवशी मोफत सिलिंडरही देण्यात येणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने जाहीरनाम्यात उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळीला मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. यासाठी मागील वर्षी होळी आणि दिवाळीच्या दिवशी उज्ज्वला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठी अंदाजपत्रकात ३३०० कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता या दिवाळीपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी या योजनेशी संबंधित प्रस्तावावर विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता दिवाळीपासून वर्षभरात दोन सिलिंडर मोफत दिले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ७५ लाख गॅस कनेक्शन आहेत. यावेळी दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच मोफत सिलिंडरचे पैसे या गॅस कनेक्शनधारकांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे पाठवले जाणार आहेत.