तरुण भरात लाईव्ह । सायसिंग पाडवी । यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असं नाही, तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येतं, हे कैलास पावरा या तरुणाने दाखवून दिलं आहे. कठोर मेहनतीच्या बळावर एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करून वयाच्या 24व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. सामान्य कुटुंबातील या युवकाने पीएसआय पदावर मजल मारून रोझवा पुनर्वसन गावासह तळोदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रोझवा पुनर्वसन (ता. तळोदा, जि. नंदुरबार) या छोट्याशा गावातील रमेश पावरा व चिकीबाई पावरा या दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी. या कुटुंबाकडे गाव पुनर्वसन झाल्याने समाधानकारक शेती नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा भार व मुलांच्या शिक्षणाची मदार पेलणे कठीण असल्याने पावरा दाम्पत्य इतरांच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतात. विशेषतः घरची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कसर सोडली नाही. त्यांचा मोठा मुलगाही मोलमजुरी करतो. मुलीचे लग्न झाले आहे. तर, दुसरा मुलगा कैलासने आता पीएसआय पदाला गवसणी घातली आहे.
कैलासचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जि.प.शाळा रोझवा पुनर्वसन येथे तर, पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे येथे झाले. त्यानंतर जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेच्या पदवीचे शिक्षण घेतले.
कुटुंबाला हातभार, सोबतच परीक्षेची तयारी
पदवीच्या तृतीय वर्षाला असताना कैलासने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली. सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये मैदानी चाचणी तर, मार्च 2023 मध्ये मुलाखत पार पडली. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (ता.4) जाहीर झाला. यात कैलासने यश संपादन करून पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. गावखेड्यातील या युवकाने मैदानी चाचणीतही शंभरपैकी 93 गुण घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले. कैलासने कुटुंबाला आधार देण्यासाठी आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात मोलमजुरी केली आहे. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
सेल्फ स्टडीवर भर
कोणताही क्लास न लावता त्याने सेल्फ स्टडीवर भर दिला. यावेळी अनेक मित्रांनी त्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत केली. कुटुंबाने सोसलेल्या हालअपेष्टा व कष्टाची जाणीव होती. त्यामुळे कैलासने जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेऊन एमपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून पीएसआय पदावर मजल मारणार्या एकूण 650 जणांमध्ये कैलास पावरा हा सर्वांत कमी वयाचा असल्याचे समजते. कैलासची यशोगाथा ही ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे, यात तिळमात्र शंका नाही.
प्रतिकूल परिस्थितीवर केली मात
कैलासने आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मोलमजुरी केली. अशा कठीण काळातही त्याने शिक्षण व अभ्यासाची नाळ तुटू दिली नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पावरा यांनी ध्येय गाठले. संघर्ष जेवढा कठीण तेवढा यशाचा आनंद जास्त असतो. असाच आनंद पावरा कुटुंबासह अवघ्या रोझवा पुनर्वसन ग्रामस्थांना झाला आहे.