---Advertisement---
जळगाव : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जळगावच्या अयोध्यानगरात वास्तव्यास असलेल्या गायिकेसह एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य असे २२ भाविक अडकून पडले आहेत. दरम्यान, सर्व भाविक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
उत्तरकाशी प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर ही माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. जळगावच्या अन्य १९ भाविकांमध्ये पाळधीचे (ता. धरणगाव) १३, धरणगावचे ५ आणि पाचोऱ्यातील एक जवानाचा समावेश आहे. तेदेखील सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
गायिका अनामिक मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे उत्तरकाशीला दर्शनासह एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी गेले होते. तीन दिवसांपासून मेहरांशी संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतित पडले होते. त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क केला. तेव्हा नियंत्रण कक्षाने उत्तरकाशी प्रशासनाकडून माहिती घेतली.
उत्तरकाशीतील प्रशासनाच्या माहितीनुसार सर्वच कंपन्यांचे मोबाइल टॉवर वाहून गेले आहेत. त्यामुळे या भागात कुठल्याही कंपनीची मोबाइल सेवेला नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही. मेहरा कुटुंबीय दोन दिवस या प्रशासनाच्या निगराणीखाली वास्तव्यास होते. मात्र आता त्यांना नजीकच्या एका गावात सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.