नांदेडः नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधातून एका २३ वर्षीय तरुणीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. शुभांगी जोगदंड वय २३ असे मयत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, मामा, भाऊ आणि काकांची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केली आहे.
सूत्रानुसार, नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे ही घटना घडली आहे. शुभांगी जोगदंड ही बीएएमसमध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरूणासोबत तिचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरे एक स्थळ पाहून तिचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आठच दिवसात हे लग्न मोडायला भाग पाडलं. त्यामुळे गावात बदनामी झाली.
गावात बदनामी झाल्यामुळं कुटुंबीय नाराज होते. त्यामुळं रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली कुटुंबियांनी दिली. रविवारी रात्री म्हणजेच २२ जानेवारी रोजी शुभांगीची कुटुंबियांनी हत्या केली. तिचा मृतदेह शेतातच जाळला. तसंच बाजूच्याच ओढ्यात ती राख टाकून दिली.
शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यामुळे मित्र- मैत्रिणींमध्ये चर्चा सुरु झाली. शुभांगी नेमकी कुठे हरवली, याची शोधाशोध सुरु झाली. गुप्त बातमीदाराने यासंबंधी पोलिसांकडे माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता तेव्हा हा प्रकार उघड झाला आहे.