मुंबई : मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (26/11) पाकिस्तानी वंशाचा कॅनडा स्थित तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने केला होता. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाईसाठी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अमेरिकेत मागणी केली. त्यावर न्यायालयाने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १६६ लोकांनी प्राण गमावले होते. या प्रकरणात तहव्वूर राणाचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झालं. भारताने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी याचिका दाखल केली होती. भारताने केलेल्या विनंतीच्या समर्थनार्थ आणि विरोधात सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे पुनरावलोकन न्यायालायने केले आहे. तसंच, या दस्तावेजांचा सुनावणीवेळी विचार केला आहे, असं न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी ४८ पानांच्या आदेशात म्हटलं आहे.
पाकिस्तानी-अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर ए तोयबामध्ये सामील होता. तहव्वूर राणाने त्याला अप्रत्यक्ष मदत केली होती. हेडलीच्या कारवायांना संरक्षण देण्याचं काम राणाने केलं होतं. दहशतवादी कृत्याच्या कटाचा भाग म्हणून राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केली. न्यायाधीशांनी म्हटलं आहे की, भारताने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. राणावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांखाली अमेरिकेत कार्यवाही केली जातेय. युद्ध पुकारणे, हत्या करणे, फसवणूक करणे, दहशतवादी कृत्य करणे, दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे आदी विविध गुन्हा तहव्वूर राणावर लावण्यात आले आहेत.