२६/११ : कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकाचा 14 वर्षांपासून वनवास ?

मुंबई :  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या हातात असणाऱ्या लाठीच्या साहाय्याने क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारे केडंबे गावचे सुपुत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे त्यांच्या जन्मगावी प्रस्तावित असलेले स्मारक गेल्या १४ वर्षांपासून रखडले आहे.

देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाबाबत प्रशासन उदासीन असून, हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा वनवास नेमका कधी संपणार? असा सवाल जावळी तालुक्यातून उपस्थित होत आहे.

देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा दगड देखील गेल्या १४ वर्षांपासून हलला नसल्याने प्रशासन हुताम्याप्रती किती संवेदनशील आहे, याचा नमुना प्रशासनाने दाखवून दिला आहे. या स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

देशासाठी अतुलनीय शौर्य
२६/११/२००८ ची काळरात्र अजूनही भारतीयांच्या काळजात धस्स करून जाते. समुद्रमार्गे दहशतवाद्यांनी मुंबईतील प्रमुख ठिकाणी जोरदार हल्ले चढवले होते. मुंबई येथील गिरगाव चौपाटी येथे बंदोबस्तासाठी असणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी आपल्या हातातील काठीच्या साहाय्याने क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडले होते. स्वतःच्या शरीराची चाळण झाली, तरी ओंबळे यांनी कसाबला पकडून ठेवले होते.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्‍मारक उभारण्‍यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी हुतात्मा ओंबळे यांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, याबाबत लागेल एवढा निधी राज्य सरकार देईल, अशी ग्वाही दिली होती.

पुढील आठवड्यात निर्णय 

मुंबईवर २६ नोव्‍हेंबर २००८ मध्‍ये झालेल्‍या अतिरेकी हल्‍ल्‍यात हुतात्‍मा झालेले पोलिस अधिकारी तुकाराम ओंबळे यांच्‍या स्मृतिदिनी त्‍यांचे स्‍मारक बांधण्‍याचा निर्णय घेऊन शासनाने त्‍यांना आदरांजली वाहिली. हे स्‍मारक केडंबे येथे बांधण्‍यात येणार असून, त्‍यासाठी ७१ कोटींचा निधी देण्याचे प्रस्तावित आहे. त्‍याबाबत पुढील आठवड्यात शासन निर्णय निर्गमित होईल, असे संकेत आहेत.
याबाबत शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मारकाच्या संदर्भात भेट घेतली. त्‍यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ राज्याचे प्रधान सचिवांना फोन लावून स्मारकाची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्‍यास सांगितले, तसेच येणाऱ्या अधिवेशनात स्मारकाचा निधी मंजूर करून मी स्वतः भूमिपूजनाला येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

केडंबे ग्रामपंचायतीकडून हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा उपलब्ध करून दिली असून, ही जागा शासनाकडे वर्ग देखील झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मारकासाठी लागेल एवढा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. या स्मारकाचे भूमिपूजन २६/११ ला न झाल्यास येत्या ३० नोव्हेंबरपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे.
-महादेव ओंबळे, उपसरपंच केडंबे

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी लागेल एवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगल्‍या दर्जाचे स्मारक उभारण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. हुतात्मा ओंबळे यांचा अतुलनीय पराक्रम युवापिढी समोर येण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, लवकरच स्मारकाच्या कामास प्रारंभ होईल.
-एकनाथ ओंबळे, जिल्‍हा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)