---Advertisement---
Archana Murder news : ईएमआय (EMI) न भरल्यामुळे ऑटो जप्त होईल, या भीतीने मैत्रिणीचा खून करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्चना (२७) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, मृत अर्चना विवाहित असून, तिला दोन मुले आहेत. ती लग्नसमारंभात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. दरम्यान, ती ईशा फाउंडेशनला जाण्यासाठी मित्रांसह घरातून निघाली होती, मात्र ती परतलीच नाही. नामगोंडालू गावाजवळ तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी ऑटोचालक राकेश आणि त्याची मैत्रीण अंजली यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, याचे खुनाचे रहस्य उलगडले.
ऑटो चालवण्यापूर्वी राकेश हा लग्ना लग्नसमारंभात स्वयंपाक बनवण्याचे काम करायचा. त्या वेळी त्याची भेट अर्चनाशी झाली. दोघेही मित्र होते. ईशा फाउंडेशनला जाण्यासाठी अर्चनाने राकेशशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली होती, तेव्हा राकेशची नजर अर्चनाच्या सोन्याच्या मंगळसूत्रावर पडली.
राकेशने फायनान्सकडून कर्ज घेऊन ऑटो खरेदी केली होती आणि गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा ईएमआय भरला नव्हता. ऑटो जप्त होईल या भीतीने राकेशने अर्चनाचे मंगळसूत्र चोरण्याचा विचार केला. त्यानंतर त्याने हे त्याची दुसरी मैत्रीण निहारिकाला सांगितले, निहारिकाने हे तिच्या जवळच्या मैत्रिणी अंजलीला सांगितले.
गाडीतच गळा दाबून केला खून
अंजलीने तिचा दुसरा मित्र नवीनला सांगून, राकेशला पाठिंबा देण्यास सांगितले. त्यानंतर राकेशने अर्चनाला फोन करून ईशा फाउंडेशनला जाण्यासाठी तयार राहा, असे सांगितले. नवीन, राकेश आणि अंजली पीजी मालकाची गाडी घेऊन गेले. अर्चनाला बसवून ते दिवसभर फिरत राहले आणि सायंकाळी तिचा गाडीतच गळा दाबून खून केला.
खून केल्यानंतर अर्चनाच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. तिचा मृतदेह नामगोंडालू गावाजवळ फेकून देऊन पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, फरार दोन आरोपींचाही शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.