भुसावळ पश्चिम बंगालच्या सुवर्ण कारागीराने कुर्ल्यातील सराफाकडील 500 गॅ्रम सोने चोरल्यानंतर गावाकडचा रस्ता धरला मात्र यंत्रणेला भुसावळात अलर्ट मिळाल्यानंतर रविवारी पहाटे साडेतीन वाजता आरोपीच्या मुसक्या मुसक्या आवळण्यात यश आले. सुदाम निमाई सामंता (31, बांदीपूर, हुगळी, पश्चिम बंगाल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीचा रविवारी दुपारी तीन वाजता कुर्ला पोलिसांनी ताबा घेतला.
कुर्ला पोलिसात दाखल होता गुन्हा
मनोज मोहनलाल जैन (50, कुर्ला, मुंबई) यांचा मुंबईतील कुर्ला भागातील 241/ए, देवी भवन, गोल बिल्डींग, पहिला माळा येथे सोन्याचे दागिणे बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात पश्चिम बंगाल भागातील सुमारे 15 कारागीर अनेक वर्षांपासून कामाला आहेत. संशयित सुदाम सामंता हा देखील कारागीर असल्याने त्याच्याकडे 498 ग्रॅम सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते. शनिवारी दुपारी दिड वाजता जैन हे जेवायला गेल्यानंतर कारागीराने संधी साधत रेल्वेने धूम ठोकली. दुपारी अडीच वाजता जैन हे कारखान्यात आल्यानंतर जैन यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेत कुर्ला पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. संशयिताचा फोटो, पत्ता व वर्णन दिल्यानंतर यंत्रणेने तपासचक्रे फिरवली.
पहाटेच्या सुमारास आरोपीला अटक
कुर्ला आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीणा व कुर्ला पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक गणेश काळे यांनी भुसावळ स्टेशनचे निरीक्षक आर.के. मीणा यांना शनिवारी रात्री पावणेदहा वाजता याबाबत माहिती दिल्यानंतर संशयितांचा फोटोदेखील प्राप्त झाल्याने भुसावळ विभागीय सुरक्षा आयुक्त एच.श्रीनिवास राव, सहायक सुरक्षा आयुक्त बी.पी.कुशवाहा यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीडीएस पथक तयार करण्यात आले. उपनिरीक्षक के.आर.तरड, हवालदार श्रीकृष्ण कोळी, हवालदार विनोदकुमार गुर्जर आणि हवालदार इम्रान खान, हवालदार महेंद्र सिंह कुशवाह, हवालदार सागर पकडले आणि कॉन्स्टेबल दीपक शिरसाठ यांनी डोळ्यात तेल घालून शनिवारी रात्रीपासूनच हावडाकडे जाणार्या गाड्यांची तपासणी सुरू करीत भुसावळ रेल्वे स्थानकाच्या विविध भागात संशयिताचा शोध सुरू केला. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खंडवा बाजूने दिशेने हवालदार श्रीकृष्ण कोळी यांना संशयित आरोपी दिसताच बॅगेसह येत असल्याचे दिसताच त्यास ताब्यात घेवून रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणण्यात आले. यावेळी संशयिताच्या बॅगेतून 28 लाख रुपये किंमतीच्या 32 सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुर्ला पोलीस स्टेशन मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश काळे हे कर्मचार्यांसह आल्यानंतर त्यांनी आरोपीचा ताबा घेतला. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतमुळे चोरटा पकडण्यात यश आल्याने यंत्रणेचे कौतुक करणयात आले.