---Advertisement---
कासोदा : येथील विश्राम नगरमधील रहिवासी बंटी ज्ञानेश्वर गादीकर (वय २९) या युवकाने स्वतःच्या शेतात बाभळाच्या झाडाला ठिबकच्या नळीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत व्यक्तीचे काका गोरख संतोष गादीकर (वय ४६) यांचं खबरीवरून कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर अकस्मात मृत्यूचा तपास कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या आदेशाने हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे, योगेश पाटील हे करीत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.
एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, असा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून येथे सुरू आहे. याबाबत एकही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. ज्या ज्या वेळेस असा प्रकार घडतो त्या त्या वेळेस घरातील प्रमुख व्यक्तींना सर्व दुःख विसरून सदर शवविच्छेदनासाठी एरंडोलला हेलपाटे मारावे लागतात.
कासोदा हे गाव चाळीस हजाराच्या आसपास लोकसंख्येचे गाव असून येथे मात्र शवविच्छेदनाची व्यवस्था नसल्याने याबाबत ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.येथे गेल्या अनेक वर्षापासून शविच्छेदनासाठी एरंडोल येथे जावे लागते.गेल्या वर्षभरापासून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच कोटीची सुसज्ज अशी इमारत कासोदा येथे बांधण्यात आली आहे व या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत परंतु शवविच्छेदन होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या दूर करावी अशी मागणी होत आहे.