जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक तास चाललेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. ठार झालेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, केंद्रशासित प्रदेशातील डोंगराळ जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी झालेल्या दुहेरी दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) द्वारे सखोल शोध आणि घेराबंदी केली जात आहे. या शोध मोहिमेदरम्यान बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गंडोह भागातील बाजड गावात गोळीबार सुरू झाला.
एके ४७ रायफलही जप्त
जम्मू-काश्मीर पोलिसांनी या चकमकीबाबत माहिती दिली की, डोडा जिल्ह्यातील गंडोह, भदरवाह सेक्टरमध्ये सुरू असलेल्या संयुक्त कारवाईत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 2 एम 4 आणि एक एके 47 रायफल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.