जळगाव : जिल्हा नियोजन समितीतून जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत महापालिकेला तीन योजनांच्या माध्यमातून तीस कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून दलितेत्तर वस्ती सुधारण्यासाठी शहरातील पाच प्रभाग तर इतर निधींमधून 52 प्रभागाचा विकास समान निधी वाटपाने करता येऊ शकतो. सोबतच याच महिन्यात नोकर भरती आयुक्त करू शकतात, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी 4 रोजी महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये अजूनही विकासकामांचा श्रीगणेशा झालेला नाही. त्यावर या निधीच्या माध्यमातून कामे केली जाऊ शकतात, असे मत महापौर महाजन यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा नियोजन समितीतून जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेत 9 कोटी 88 लाख 800 रु, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना 5 कोटी 36 लाख 12 हजार रु, नागरी दलित वस्ती सुधार योजनेत 14 कोटी 94 लाख असा एकूण 30 कोटी 18 लाख 82 हजार 800 इतका निधी महापालिकेस 16 जून 2023 रोजी प्राप्त झाल्याचे पत्र मिळाले आहे.दलित वस्ती सुधार योजनेसाठी 14 कोटी 94 लाख निधी
शहरातील दलित वस्ती अंतर्गत 1,3,4,10,13 हे प्रभाग येतात. यातून नागरी दलित वस्ती सुधार योजनेत मिळालेल्या 14 कोटी 94 लाख निधीचे समान वाटप केल्यास या 5 प्रभागातील 20 नगरसेवकांना काम करण्यासाठी प्रत्येकी 74 लाख निधी मिळेल. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना यातून मिळालेला 15 कोटी 24 लाख 82 हजार 800 रु यातून शहरातील 52 नगरसेवकांनी सामान निधी वाटप केल्यास प्रत्येकाच्या प्रभागाच्या विकास कामांसाठी 30 लाख रु मिळू शकतात. या सोबतच नगर सेवकांना 25 लाखाचा स्वतंत्र निधी महापालिका फंडातून विकास कामांसाठी दिला आहे. यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील राहिलेल्या विकासकामांसाठी शहर अभियंता यांच्याकडून प्रस्ताव बनवून लवकरात लवकर महापौर कार्यालयात सादर करावे. ती कामे शेवटच्या होणार्या महासभेपुढे ठेवता येतील व त्यांना मान्यता देता येईल असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे. सोबतच महापालिकेत सहा-सहा महिन्यांसाठी आयुक्त यांच्या अधिकारात असलेल्या प्रत्येक विभागात लवकरच नोकर भरती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.