Jarange Patil : सरकारच्या शिष्टमंडळासोबत मध्यरात्री चर्चा; नक्की काय घडलं?

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे. दरम्यान, मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाशी बंद दाराआड चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली असून, सकाळी मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यावर समाधानी आहे की नाही हे कळेल. आज दिवसभर त्यांची वाट पाहू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मागील सत्तरा दिवसांपासून मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. बुधवारी (ता. 13) रात्री आकार वाजेच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नारायण कुचे हे राज्य शासनाकडून शिष्टाई करण्यासाठी आले होते. सुमारे साडेतीन ते पावणे चार तास आंदोलक श्री. जरांगे यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी मागील सत्तरा दिवसांपासून मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वाधिक काळ चालणारे हे आंदोलन आहे. या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली असून मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पावलेही शासन उचलत आहे.
आंदोलक श्री. जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली असून या चर्चेतील मुद्द्यांवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सकाळी आम्ही मुंबईला जाणार आहोत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी कधी भेट द्यावी हा त्यांचा अधिकार असून आंदोलन कधी मागे घ्यावे हा आंदोलन श्री. जरांगे यांचा अधिकार आहे. मात्र, आंदोलक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने यातून लवकरच तोडगा निघेल, असे ही श्री. दानवे म्हणाले.

चर्चा सकारात्मक झाली आहे. राज्य शासनाचा निरोप येईल. मात्र, समाधानी होण्यासाठी आज सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागले. आंदोलनाची पुढील दिशानंतर ग्रामस्थ व शिष्टमंडळाशी चर्चा करून ठरवली जाईल, असे श्री जरांगे म्हणाले.