Assembly Election 2024 । जळगावात तीन; जिल्ह्यात ३३ महिला विशेष मतदान केंद्रे

जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३६ लाख ७८ हजार ११२ मतदार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत तीन हजार ६७७ नियमित मतदान केंद्रे, तर सहा साहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत. यात जळगाव शहरात तीन, तर जिल्ह्यात ३३ महिला विशेष मतदान केंद्रांसह ५५ आदर्श, ७२५ पडदानशीन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेला अधिक सुरळीत आणि व्यापक करण्यासाठी काही नावीन्यपूर्ण उपक्रम आखलेल्या आहेत. यात लोकोत्सवादरम्यान लोकशाहीच्या मतदारांना मतदानासाठी उद्युक्त, प्रोत्साहित वा आकर्षित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात मतदान केंद्रांत विविध सुविधांसह नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात दिव्यांग, महिला, युवा तसेच आदर्श मतदान केंद्रांचा समावेश आहे.

३३ महिला मतदान केंद्रे
ज्या परिसरातील मतदान केंद्रांतर्गत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. मात्र, मतदानाचा टक्का अपेक्षितपणे पूर्ण होत नाही, महिला मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या केंद्रांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून ३३ महिला (सखी) मतदान केंद्रे उभारणी करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये पोलिसांपासून निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सर्वच महिला असतील. महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही.

२२५ पडदानशीन मतदान केंद्रे
बुरखाधारी महिला मतदारांसाठी पडदेयुक्त अशा २२५ विशेष मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. यात केंद्रातील अधिकाऱ्यांच्या पथकात फक्त महिला अधिकाऱ्यांचाच समावेश असेल. पडदानशील महिला मतदान केंद्रही असून, महिला अधिकाऱ्यांकडून पडदानशीन महिला मतदारांची ओळख पटविली जाणार आहे.
५५ आदर्श मतदान केंद्रे
जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत ५५ आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांत १२१ घोषवाक्ये, संस्कृती आदी संकल्पनांवर साकारली जाणार आहेत.

११ युवा मतदान केंद्रे
युवा मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी ११ युवा म तदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. दिव्यांग नागरिकांनाही मुख्य प्रवाहात आणून त्यांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी दिव्यांग मतदान केंद्रे नियोजित केली आहेत.