मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला सलाम करत, या संदर्भातील अनेक मोठ्या घोषणा केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे त्यामुळे या महोत्सवासाठी तब्बल ३५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी सुमारे ५० कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील शिवचरित्रावरील उद्यानांसाठी अंदाजे २५० कोटी रुपयांची मदत फडणवीसांनी जाहीर केली. तसेच, शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभे केले जाणार असून शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी घोषणा फडणवीसांनी अर्थसंकल्पात जाहीर केला.
फडणवीस म्हणाले की, आमच्या पहिल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना पुन्हा चालू केली जाणार आहे. मधल्या काळात ज्या शेतकर्यांना लाभ मिळाले नाहीत त्या शेतकर्यांना याचे लाभ दिले जाणार आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह आदींसाठी १००० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. कोकणात काजू, बोंडू प्रक्रिया केंद्र उभारणार. काजू फळ विकास योजना आजरा आणि चंदगडमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबास दोन लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल, असेही फडणवीसांनी जाहीर केले.