NEWS CLICK : भारत विरोधी प्रचारासाठी मीडिया पोर्टलला परदेशातून 38 कोटींची फंडींग

नवी दिल्ली : भारत विरोधी प्रचारासाठी मीडिया पोर्टल न्यूजक्लिकला परदेशातून सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात आढळून आले होते. अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघमकडून न्यूजक्लिकला सातत्याने निधी दिला जात असल्याचे तपासात आढळून आले. नेव्हिलवर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) सोबत संबंध असल्याच्या आरोप आहे. याबाबत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने देखील त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आज लोकसभेत न्यूज क्लिक (NEWS CLICK) मीडिया पोर्टलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dube) यांनी NEWS CLICK ला देशविरोधी म्हटले आणि चीनकडून निधी मिळत असल्याचा दावा केला. यासोबतच मीडिया पोर्टलवर चीनच्या निधीद्वारे सरकारविरोधात वातावरण निर्माण केल्याचा आरोपही केला. एवढंच नाही तर निशिकांत यांनी या मुद्द्यावरुन काँग्रेसवरही टीका केली.

यानंतर केंद्रीय आयटी मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर भाष्य केले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सारखी वृत्तपत्रे देखील मान्य करत आहेत की, नेव्हिल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूजक्लिक पोर्टल कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) चे धोकादायक शस्त्र आहे आणि जगभरात चीनच्या राजकीय अजेंडाचा प्रचार करत आहे,’

अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल गांधींच्या बनावट ‘मोहब्बत की दुकान’मध्ये चिनी वस्तू आहेत. न्यूज क्लिक सुरू झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. हा भारतविरोधी अजेंडा आम्ही चालू देणार नाही. चीनबद्दलचे प्रेम आणि परदेशातून विदेशी वृत्तसंस्थांच्या माध्यमाद्वारे भारताविरोधात अपप्रचार प्रचार केला जात होता. हे लोक अँटी इंडिया आणि ब्रेक इंडिया मोहीम चालवायचे,’ अशी टीका त्यांनी यावेळी केली.

न्यूयॉर्क टाईम्सपूर्वी भारत जगाला सांगतोय की, न्यूजक्लिक चिनी प्रचाराचे धोकादायक वेब आहे. समविचारी शक्तींच्या पाठिंब्याने नेव्हिल भारतविरोधी अजेंडा पुढे ढकलतोय. 2021 मध्ये जेव्हा एजन्सींनी मनी लाँड्रिंगच्या भक्कम पुराव्याच्या आधारे न्यूजक्लिकच्या विरोधात तपास सुरू केला, तेव्हा काँग्रेस आणि संपूर्ण डाव्या-उदारमतवादी इकोसिस्टमने त्यांचा बचाव केला.

हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्यांनी 2008 मध्ये भारतातील चिनी हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी CPC सोबत सामंजस्य करार केला आणि चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशन (RGF) ला कथितपणे देणग्या स्वीकारल्या? UPA हजार वेळा नाव बदलू शकते, पण अहंकारी युतीच्या हातात देश सुरक्षित राहणार नाही, हे आता लोकांना माहीत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.