मोठी बातमी; ४१ कोटी भारतीय गरीबीतून बाहेर; संयुक्त राष्ट्रांचा रिपोर्ट

नवी दिल्ली : भारताने गरीबीवर मात करण्याच्या दृष्टीने एक मोठी कामगिरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतातील ४१.५ कोटी नागरिक दारिद्र्यातून बाहेर आल्याचं यूएनने म्हटलं आहे. २००५-०६ ते २०१९-२१ या कालावधीमधील ही आकडेवारी असल्याचं यूएनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या १५ वर्षांच्या काळात देशातील गरीबी मोठ्या प्रमाणात कमी झाली.

वैश्विक बहुआयामी गरीबी इंडेक्सने ही आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफोर्ड गरीबी आणि मानव विकास मोहीम या संस्थांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमध्ये ही माहिती देण्यात आली. वेगाने विकास होत असलेल्या देशांमध्ये भारतासह कंबोडिया, चीन, कांगो, होंडुरास, इंडोनेशिया, मोरक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम अशा देशांचा समावेश आहे. केवळ भारतच नाही, तर आणखी २५ देशांनी या काळात आपल्या गरीबी इंडेक्समध्ये सुधारणा घडवून आणली आहे.

२००५-०६ साली देशातील गरीबांची टक्केवारी ५५.१ टक्के होती, जी २०१९-२१ या कालावधीमध्ये केवळ १६.४ टक्के एवढी झाली. २००५-०६ साली देशातील बहुआयामी गरीबांची संख्या ६४.५ कोटी होती. तर, २०१५-१६ साली ही संख्या ३७ कोटींवर पोहोचली. त्यानंतर २०१९-२१ या वर्षीपर्यंत ही संख्या केवळ २३ कोटींवर आली आहे.

भारतातील पोषण संकेतांकानुसार गरीब आणि वंचित लोकांची टक्केवारी २००५-०६ साली ४४.३ टक्के होती. ती आता कमी होऊन केवळ ११.८ टक्के झाली आहे. तसेच, बालमृत्यू दर ४.५ टक्क्यावरुन १.५ टक्क्यांवर आला आहे. २००५-०६ मध्ये ५२.९ टक्के लोकांकडे अन्न शिजवण्यासाठी इंधन उपलब्ध नव्हते. आता ही संख्या १३.९ टक्के आहे.