यवतमाळ : पुरात ४५ जण अडकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल

तरुण भारत लाईव्ह । यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून लवकरच भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील.

महागाव तालुक्यात सुमारे २३१ मिमी पाऊस झाला आहे. माझे सहकारी आमदार मदन येरावारसुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे ट्वीटउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.फडणवीस यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला, त्यानंतर त्यांनी हे ट्वीट केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शासनाकडे पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली होती.

जिल्ह्याला रेड अलर्ट 

यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने यवतमाळ शहराला  झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नदी नाल्याला पूर आल्यानं पाणी गावात शिरलं आहे. यवतमाळ शहराला लागून असलेल्या वाघाडी गावात पहाटेच्या सुमारास पाणी शिरलं. येथील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे.