हैदराबाद : तेलंगणामधील भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रामध्ये ताकद लावत लावत आहे. पक्षाचे प्रमुख के सी चंद्रशेखर राव यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र तिकडे तेलंगणा विधानसभा निवडणुकींमधील गैरप्रकारांमुळे तेलंगणा राज्य संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे.
तेलंगणामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आजतागायत पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४८ कोटी रुपये रोख, सोनं आणि मोठ्या प्रमाणात दारु पडकण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८.३२ कोटी रुपये रोख, ३७.४ किलो सोनं आणि ३६५ किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच, ४२. २०३ कॅरेटचे हिरेही जप्त केले आहेत. या मौल्यवान वस्तुंची एकूण किंमत १७.५० कोटी एवढी आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राज्य आणि आंतरराज्यीय सीमांवर ४,७२ कोटी रुपयांची १,३३,८३२ लीटर दारु, २,४८ कोटी रुपयांचा ९०० किलो गांजा, ६२७ साड्या, ४३,७०० किलो तांदूळ, ८० शिलाई मशिनी, ८७ कुकर आणि दोन कार जप्त केल्या आहेत. दक्षिण भारतात निवडणूक काळात दारु, शिलाई मशिन, साड़ी आणि कुकर सहित घरगुती वस्तू वाटण्याचा प्रकार सर्रास घडतो. म्हणूनच, निवडणूक आयोग या घटनांवर लक्ष ठेऊन आहे.
तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ११९ जागांसाठी निवडणूक होत आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख केसीआर (kcr) सत्तेची हॅटट्रिक साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि भाजप देखील पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर बसपा आणि AIMIM ‘किंगमेकर’ बनण्यासाठी उत्सुक आहे.