संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाच्या ५० पदाधिकार्‍यांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : नाशिकमधील पडझड थांबविण्यासाठी उद्धव ठाकरे हे काही दिवसांनी नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. त्याच्या पुर्वतयारीसाठी संजय राऊत हे नाशिक दौर्‍यावर आहेत. ते नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाच्या ५० पदाधिकार्‍यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केल्याने नाशिकमध्ये हा दुसरा झटका बसला आहे. काही दिवसांपुर्वीच ठाकरे गटाच्या १२ आजी-माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

पक्षप्रवेश केल्यानंतर पदाधिकार्‍यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या गटात प्रवेश करत आहेत, याचाच अर्थ आमचे काम त्यांना आवडत आहे. कुणीही कितीही आमच्यावर आरोप केले तरी आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मागच्या सहा महिन्यात जे जे निर्णय घेतले, ते सर्वसामान्य माणसांसाठी घेतले. शेतकर्‍यांपासून, युवक, महिला, शिक्षक अशा प्रत्येक वर्गाचे प्रश्न सोडविल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही बॉम्ब फोडू म्हणाले, पण खोदा पहाड और चुहा भी नही निकला. विरोधकांनी असा आव आणला की, सरकारने खूप मोठा घोटाळा झालाय, पण हाती काहीच लागले नाही. विरोधकांनी आधी माहिती घेतली असती तर त्यांची अशी फसगत झाली नसती.

याआधी १२ नगरसेवकांनी केला जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले खासदार संजय राऊत हे संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक दौर्‍यावर आहेत. याआधीही संजय राऊत नाशिकमध्ये येऊन गेले होते. ते गेल्यानंतर १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे जानेवारी महिन्यात सभा घेणार होते, मात्र त्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.