मुंबई : क्रिप्टोकरन्सीमुळे अनेकांचे दिवाळे निघाले आहे. क्रिप्टो व्यवहारांमध्ये मोठे आर्थिक घोटाळे झाल्यामुळे देशात यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही या क्रिप्टोकरन्सीच्या घोटाळ्याचे जाळे पसरत असल्याचे समोर आले आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणार्यांचे तब्बल ५०० कोटी बुडाल्याचे म्हटले जात असून याप्रकरणी आता एका माजी मंत्र्यांच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई टीम इंडियाचा अंडर १९चा माजी कर्णधार विजय झोलवर याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना गुंडाकरवी पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आलाय. जालन्यातील घनसांगी पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली होती. मात्र क्रिप्टोकरन्सीची बाजार मूल्य घसरल्याने खोतकर यांच्या जावयाने किरण खरात यांना दोषी धरले. यासाठी मला दोषी धरुन क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप किरण खरात यांनी केला. यानंतर पोलिसांनी विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह १५ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार किरण खरात हे उद्योजक असून क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. क्रिप्टोच्या व्यवहारातून किरण खरात यांना बीएमडब्लू कारही गिफ्ट मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांनी याकडे आकर्षित होऊन क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले होते. यामध्ये विजय झोल यांनीही पैसे गुंतवल्याचे समोर आले आहे. मात्र जागतिक मंदीमुळे यामध्ये गुंतवणूक करणार्यांचे पैसे बुडाले. किरण खरात यांनी ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे किरण खरात यांनीच आपल्याला धमकावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.