मणिपूर हिंसाचारात ५४ जणांचा मृत्यू; १०,००० जवान उतरले रस्त्यावर

मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, मणिपूरमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे १०,००० जवान राज्यात तैनात करण्यात आले आहेत. मणिपूरमध्ये पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मणिपूरमध्ये लष्कर आणि सशस्त्र दलांच्या मदतीने हिंसाचार आटोक्यात आणण्यात आला असला तरी त्याची धग कायम आहे.

पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, समुदायांमधील भांडणात अनेक लोक मारले गेले आहेत. याशिवाय सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. पोलीस मात्र याची पुष्टी करण्यास तयार नव्हते. हे मृतदेह इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, चुराचंदपूर आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या अनेकांवर आरआयएमएस आणि जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत.

संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, तणावग्रस्त भागात अडकलेल्या एकूण १३,००० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांना लष्कराच्या छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. लष्कराच्या पीआरओने सांगितले की, सुरक्षा दलांच्या तत्पर कारवाईमुळे हिंसाचारग्रस्त भागातील विविध अल्पसंख्याक भागातील लोकांची सुटका करण्यात आली. चुराचंदपूर, कांगपोकपी, मोरे आणि ककचिंगमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे.