यंदा तीव्र उष्णतेचा इशारा! केंद्राने राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करून दिल्या ‘या’ सूचना

नवी दिल्ली । एप्रिल  महिन्याच्या सुरुवातीलाच देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशा स्थितीत हवामान खात्याने (IMD) उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत कडक ऊन पडण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.  याचीच दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी  मोठी बैठक घेतली. यातआयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.

बैठकीनंतर मनसुख मांडविया म्हणाले, “आयएमडीने या वर्षी एल निनोचा अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता जास्त आहे. आयएमडीने म्हटले आहे की, या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. ते म्हणाले की, हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे आणि उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात टाळण्यासाठी मी, आयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह तपशीलवार आढावा घेतला आहे आणि केंद्राला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.”

केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्यात जेवढे तापमान दिसून येते त्यापेक्षा यंदाचे तापमान जास्त असेल. या पार्श्वभूमीवर जनतेला विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ते म्हणाले की, यंदा तुम्ही निवडणूक प्रचारासाठी जाल तेव्हा पिण्याचे पाणी ठेवा आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा. लोकांनी वेळोवेळी पिण्याच्या पाण्यासोबत ज्यूसचे सेवन करावे. याशिवाय लिंबू पाणी प्यावे. उन्हाळ्यात मिळणारी फळेही खाऊ शकता.

हवामान विभागाने दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये 6 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत दक्षिण बंगालमधील जिल्ह्यांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल ते जून या काळात देशभरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, ज्याचा मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय भागांवर गंभीर परिणाम होईल.