५९ लहान मुलांची तस्करी पकडली; ‘समतोल’च्या मदतीने भुसावळला २९ चिमुकल्यांची सुटका

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : मदरशाच्या नावाखाली बिहारमधून सांगलीमध्ये ५९ लहान मुलांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या सतर्केतेमुळे उधळून लावण्यात यश आले आहे. ‘ऑपरेशन आहट’ अंतर्गत केलेल्या संयुक्त कारवाईत दानापूर – पुणे एक्सप्रेस (०१०४०) धावत्या गाडीत भुसावळ ते मनमाड मध्ये केलेल्या तपासणीत ५९ लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. यात भुसावळ रेल्वेस्थानकावर २९ चिमुकल्यांची तर मनमाड रेल्वे स्थानकावर ३० मुलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत ‘समतोल’ प्रकल्पाच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्कप्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दानापूर – पुणे एक्सप्रेस (०१०४०) मध्ये मदरशाच्या नावाखाली बिहार मधील पूर्णिया जिल्ह्यातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली रेल्वे प्रशासनाला मिळाली होती. यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी ऑपरेशन आहट अंतर्गत केलेल्या संयुक्त कारवाईत धावत्या प्रवासी गाडीतून ८ ते १५ वयोगटातील मुलांची तस्करी करणार्‍या ५ इसमासह ५९ बालकांना ताब्यात घेण्यात आले.

भुसावळ रेल्वे स्थानकातुन गाडी सुटल्यानंतर मनमाड स्थानकापर्यंत कसून तपासणी केली असता गाडीतील वेगवेगळ्या बोगीतून एका तस्करासह ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर धावत्या रेल्वे गाडीत मनमाडपर्यंत केलेल्या तपासादरम्यान आणखी ३० मुले आणि ४ तस्करांची ओळख पटली आणि त्यांना मनमाड स्थानकात ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर भुसावळमधून सुटका करण्यात आलेल्या २९ मुलांना ‘समतोल’ प्रकल्पाच्या मदतीने जळगावला पाठवण्यात आले. याप्रकरणी मनमाड आणि भुसावळ येथे भादंवी ५७७ / २३ अन्वये ३७० तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे पोलीस, जीआरपीसोबत ‘समतोल’चे प्रतिनिधी

‘समतोल’ प्रकल्पाच्या प्रतिनिधींनी भुसावळ रेल्वे स्थानकावर या मुलांना उतरवण्यासाठी मदत केली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवल्यानंतर त्यांना जळगावला आणण्यात आले. त्यानंतर त्यांना जळगाव बालसुधारगृहात दाखल केलं. त्यावेळी त्यांच्या समवेत समतोल प्रकल्पाचे प्रतिनिधी देखील उपस्थित हाते. रेल्वे पोलिसांसोबत ‘समतोल’चे महेंद्र चौधरी, प्रतिभा महाजन, प्रशांत पाटील आणि दीपक पाचपांडे चार प्रतिनिधींनी मुलांना वाचविण्याच्या मोहिमेत सक्रियपणे सहभाग घेतला. त्यांच्या या समर्पित वृत्तीचे कौतूक होत आहे.

‘समतोल’ प्रकल्प काय काम करतो?

केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत ‘समतोल’ प्रकल्प कार्यरत आहे. किशोरवयीन मुले किंवा मुली अनेकदा घरातून पळून जातात. काही मुलांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून घर सोडण्यास भाग पाडले जाते किंवा काही मुलांचे अपहरण केले जाते. ही मुलं रेल्वे स्थानकावर आसरा घेतात. तेथे गुन्हेगारी, गैरवर्तन आणि बेकायदेशीर गोष्टींच्या क्रूर जाळ्यात सहजपणे अडकतात. अशा प्रकारच्या जीवघेण्या अनुभवांपासून या मुलांना वाचवण्यासाठी, ‘समतोल’ प्रकल्प काम २००५ पासून काम करत आहे. जळगाव व भुसावळ रेल्वेस्थानकांवर समतोलचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. समतोल वाट चुकलेल्या मुलां-मुलींना त्यांच्या घरी सुरक्षितपणे परत पाठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो.

५ वर्षात ३ हजार पेक्षा जास्त मुला-मुलींना घरी पोहचवले

या मुलांना त्यांच्या घरी पाठवण्याचे काम सोपे नाही. कायदेशीर समस्या, मुलाची मानसिक अवस्था किंवा घरी परतण्याची इच्छा नसल्यामुळे त्याच्या घरी परतण्याच्या प्रवासात काही अडथळे येतात. या समस्यांवर मात करण्यासाठी, समतोलला सरकारी आणि निमशासकीय संस्था, पोलीस विभाग, बाल कल्याण आयोग, चाइल्ड लाईन इत्यादींकडून मदत मिळते. ‘समतोल’च्या समर्पित आणि अविरत प्रयत्नांमुळे दरवर्षी ४०० हून अधिक मुले सुखरूप परत येतात. गत ५ वर्षात सुमारे ३ हजार पेक्षा जास्त मुला-मुलींना सुरक्षितपणे पोहचविण्याचे काम समतोल ने केलं असल्याची माहिती समतोल प्रकल्पाचे प्रमुख राहुल पवार यांनी दिली.