संभाजीनगर | मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मराठवाड्यातील जनतेसाठी मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. या सरकारने मराठवाड्यातील सिंचनावर कोट्यवधीची तरतूद केली आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ५९ हजार कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचं जाहीर केलं.
तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. दरम्यान, या बैठकीतून मराठवाड्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर मुख्यंमत्री यांनी पत्रकार परिषद संपल्यावर याबाबत माहिती देतांना, मराठवाड्यासाठी आज सिंचनाबाबत मोठा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहेत. एकूण 14 हजार कोटींचा निर्णय सिंचन प्रकल्पाबाबत घेतला असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच आजच्या बैठकीत एकूण 59 हजार कोटींचा निर्णय झाला असून, त्यात नदीजोड प्रकल्पाच्या 14 हजार कोटीचा समावेश आहे.
सिंचनासाठी भरीव तरतूद
35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली. यामुळे 8 लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर विविध प्रकल्पांसाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण साठ हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले. गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर 13 हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील 14 हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे 13 हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण 27 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
फडणवीस म्हणाले…
बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही 31 निर्णय घेतले होते. 2017 मध्ये यातील 10 विषय मार्गे लागले होते. तर आज घडीला यातील 23 विषय मार्गे लागली असून, 7 विषय प्रगतीपथावर असल्याचं फडणवीस म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.